यावर प्रकाशित: 13 नोव्हेंबर 2023, सकाळी 10:30 वा
धुळे वार्ता: जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान राबविण्यात येणार आहे.
यातून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेविषयी अचूक मार्गदर्शन मिळण्यास मदत होईल.(Parent Minister Mahajan remark of Separate classes for aggressive tests for formative years dhule information)
केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा, सरळसेवा परीक्षांविषयी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळावे, स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा यशाचा टक्का वाढवा यासाठी पालकमंत्री महाजन यांच्या संकल्पनेतून अभियान राबविण्यात येणार आहे.
ऑनलाइन मार्गदर्शन
जिल्हा नियोजन अधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यातर्फे अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात तलाठी, पोलिस, ग्रामसेवक, वनरक्षक, बँकिंग, रेल्वे, सैन्यभरती आदी सरळसेवा परीक्षांसह केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीविषयी मोफत ऑनलाइन मार्गदर्शन केले जाईल.
नावनोंदणीचे आवाहन
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य शासनाने ७५ हजार पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा केली असून, अनेक पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. या पदांसाठी अर्ज केलेल्या किंवा यापुढे विविध स्पर्धा परीक्षा देण्यासाठी इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन मिळावे यासाठी विशेष अभियान हाती घेण्याची सूचना पालकमंत्री महाजन यांनी दिली होती.
त्यानुसार पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी नावनोंदणीला सुरवात झाली असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी www.dhule.spardhamission.com या वेबलिंकवर नावनोंदणी करावी.
यासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा नसेल. जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या व किमान बारावी उत्तीर्ण उमेदवारांना मोफत मार्गदर्शन मिळेल. जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी टिळे यांनी केले.
अभियानाची वैशिष्ट्ये
-कोणतीही प्रवेश परीक्षा नाही
-ऑनलाइन मोफत मार्गदर्शन वर्ग
-युवक व युवतींसाठी संपूर्णपणे मार्गदर्शन
-सर्वाधिक तज्ज्ञ व नामांकित प्राध्यापक वर्ग
आवश्यक कागदपत्रे
-बारावी गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र (यूपीएससी/एमपीएससी प्रशिक्षणासाठी)
-जिल्ह्याचा रहिवास पुरावा (महाविद्यालयाचे ओळखपत्र/आधारकार्ड/ड्रायव्हिंग लायसेन्स/रेशनकार्ड/रहिवास प्रमाणपत्र)