स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची टिंगल करणे…, कंत्राटी भरतीवरून आव्हाडांची सरकारवर टीका

Share Post

मुंबई : कंत्राटी भरतीचा शासननिर्णय रद्द करण्यात आल्यानंतरही सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आधीच्या महाविकास आघाडी सरकारचे हे पाप असल्याचे भाजपाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. तर, तहसीलदार पदासारखी महत्त्वाची पदे कंत्राटी पद्धतीने का भरणार होता? असा जाब विरोधकांनी विचारला आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची टिंगल असल्याचे विरोधकांनी निदर्शनास आणून दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – उपमुख्यमंत्र्यांना जुने संदर्भ काढून आपल्या चुकांचे खापर… सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा

– जाहिरात –

विविध विभागांमध्ये कंत्राटी भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी काल, शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली होती. कंत्राटी नोकरभरती करण्याचे पाप सर्वात पहिल्यांदा काँग्रेसच्या काळात 2010पासून करण्यात आले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना अनेक खात्यांत कंत्राटी नोकरभरती केली. आज जे आमच्यावर कंत्राटी नोकरभरतीचा आरोप करत आहेत, त्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातच नऊ कंपन्यांना नोकरभरती करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. त्यांनी केलेले पाप आमच्या माथ्यावर फोडण्याचे काम सुरू असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

– जाहिरात –

त्यावर आता विरोधकांनी प्रत्यत्तर देण्यास सुरुवात केली आहे. सरकारने कंत्राटी पद्धतीने जी पदे भरण्याचा प्रयत्न केला ती तहसीलदार व नायब तहसीलदार ही पदे होती. ती अत्यंत जबाबदारीची आणि राज्याच्या महसुली खात्याशी संबंधित होती. सातबारा, फेरफार अशी शेतकऱ्यांची कामे तसेच शहरातील मोठ्या उद्योग-व्यावसायिकांची कामे यांच्याशी त्यांचा संबंध येतो. त्याचबरोबर त्यांच्याकडे काही न्यायालयीन अधिकार देखिल असतात, असे माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची लाज काढण्याइतके मोठे झालात? आव्हाडांचे मुंडेंवर शरसंधान

एमपीएससीमार्फत भरल्या जाणाऱ्या या पदांवर कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार होती. जळगावचे जिल्हाधिकाऱ्यांनी तर जाहिरात देखील काढली होती. त्यांनी खुलेआम पत्रकारांना सांगितलं होतं की, मला वरून निरोप आला होता. एमपीएससीची पदे कमी करून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची टिंगल करणे, त्यांना कंत्राटी पद्धतीवर घेणे आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे हा गैरसमज नाही तर, आपल्या चुका लोकांसमोर नेल्या होत्या. लोक शहाणी झाली आहेत. भलेही आपण स्वतःला फार हुशार समजत असलो तरी लोकांनाही खूप काही कळत असते, असेही आव्हाड यांनी सुनावले आहे.