अडयाल-चिचाल, भंडारा न्यूज देशभरात क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची जल्लोष सुरू असतानाच, पवनी तालुक्यातील चिखली टोला येथे क्रिकेट सामना हरल्यानंतर पुन्हा सामना खेळण्यावरून दोन खेळाडूंमध्ये वाद झाला. यामध्ये रागाच्या भरात एकाने दुसऱ्याच्या मानेवर बॅटने वार करून जखमी केले. तरुण बेशुद्ध झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही खळबळजनक आणि तितकीच हृदयद्रावक घटना आज दुपारी 1.30 च्या दरम्यान घडली. निवृत्तीनाथ गोपीचंद कावळे (24) असे मृत तरुणाचे नाव आहे. करण रामकृष्ण बिलवणे (21) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. हे दोघेही चिखली येथील रहिवासी आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने चिखली येथील हे युवक नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळण्यासाठी चिखली टोला येथील मैदानावर गेले होते. एक संघ एक सामना खेळल्यानंतर हरला. यानंतर हा खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी मयत निवृत्तीनाथ आणि करण यांच्यात पुन्हा सामना खेळण्यावरून वाद झाला. करणने रागाने निवृत्तीनाथ यांच्या पायावर बॅट मारली. मग तो खाली वाकला. त्याचवेळी करणच्या बॅटचा दुसरा फटका निवृत्तीला त्याच्या मानेच्या डाव्या बाजूला लागला. भंडारा न्यूज
तो जागीच बेशुद्ध पडला. त्याच्या मित्रांनी त्याला तात्काळ प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चिखली येथील रहिवासी प्रसाद रामकृष्ण धरमशरे यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीच्या आधारे अड्याळ पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.