प्रतिनिधी प्रतिमा
गोंदिया: गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भंडगा रोडवर ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता उघडकीस आली आहे. डोमेश्वर ओंकार ठाकरे (वय 35, रा. कालपाथरी कुणबीटोला) असे मृताचे नाव आहे.
या संदर्भात माहिती अशी की, गोंदिया-कोहमारा राज्य मार्गावरील गोरेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भंडगा गावातून महामार्ग जातो. कुणबीटोला येथे राहणारे डोमेश्वर ठाकरे हे त्यांच्या दुचाकी क्र. एमएच-३५/एबी-७७७३ ही भंडगा मार्गावरून महामार्गाकडे येत असताना गोंदियाहून कोहमाराकडे जाणाऱ्या ट्रकला दुचाकीची धडक बसली.
या घटनेत दुचाकी चालक ट्रकच्या मागील चाकाखाली आला. यामध्ये डोमेश्वर ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार व पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा सुरू केला.