तुमसर, शहरापासून २५ किमी अंतरावर बावनथडी नदीपासून मध्य प्रदेशची सीमा सुरू होते. याचाच फायदा घेत मध्यप्रदेशातील टेकाडी गावाच्या काठी चोरलेली वाळू टिपर व ट्रकमध्ये ओव्हरलोड करून सोंडय़ा टोला प्रकल्पाच्या पुलावरून नेली जात आहे. त्यामुळे पुलाला तडे जाण्याची शक्यता आहे. शिवाय रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
तहसीलच्या रेती घाटांचा अद्याप लिलाव झालेला नाही. तर बावनथडी नदीच्या पलीकडे असलेल्या मध्य प्रदेशातील टेकाडी येथून ट्रकमध्ये भरून प्रकल्पाच्या पुलावरून वाळूची वाहतूक नियमितपणे होत आहे. त्यामुळे रस्ता चिखलमय होऊन खड्डेमय झाले आहेत. या परिसरातून ओव्हरलोड वाळूचे ट्रक दररोज जंगलमार्गाने नागपूरकडे जात आहेत.
बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन योजना असून ती ओलांडण्यासाठी पूल बांधण्यात आला आहे. या पुलावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी असतानाही या पुलावरून वाळूने भरलेल्या ट्रकची वाहतूक सुरूच आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.