प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्यानंतर पालकमंत्र्यांनी वाढवून दिले उदिष्ट
गोंदिया : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी लागू करण्यात आलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामीण घरकुलासाठी अनुदानाच्या किमतीत ७० हजारांवरून १ लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली. खा.प्रफुल पटेल यांच्या नेतृत्त्वात ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी पालकमंत्री पद स्वीकारल्या नंतर या योजनेतंर्गत गोंदिया जिल्ह्यासाठी १८०० घरकुल मंजूर करण्यात आले होते. पण या लाभार्थ्यांच्या तुलनेत हे उद्दिष्ट कमी असल्याने ते वाढवून देण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी पाठपुरावा केला. त्याचीच दखल घेत पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी ४०० घरकुलांचे उद्दिष्ट वाढवून दिले आहे. त्यामुळे या योजनेतून २२०० लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकारणार आहे.
ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्धांना पक्के घर उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने घरकुलाची योजना तयार केली. १५ नोव्हेंबर २००८ च्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आला. या योजनेंतर्गत घराच्या अनुदानाची किंमत ७० हजार रुपये होती. इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर ही योजना राबविण्यात येत होती. वाढती महागाई लक्षात घेता ग्रामविकास विभागाने इंदिरा आवास योजनेच्या किमतीत गेल्यावर्षी ७० हजारांहून १ लाख रुपयांपर्यंत वाढ केली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या अनुदानातही आता वाढ केली आहे. त्याचा सर्वसामान्यांना लाभ मिळणार आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्याला आधी १८०० घरकुल मंजूर करण्यात आले होते. पण यानंतर अनेक लाभार्थी वंचित होते. तर अनेक लाभार्थ्यांनी या योजनेचे उद्दिष्ट जिल्ह्यासाठी वाढवून द्यावे अशी मागणी खा. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केली होती. त्याचीच दखल घेत त्यांनी या योजनेचे उद्दिष्ट वाढविण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी याची दखल घेत घरकुलाचे उद्दिष्ट १८०० वरुन २२०० केले. त्यामुळे रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला. जिल्हयातील गरजवंतांना घरकुल मंजूर झाल्यामुळे जनतेने खा प्रफुल पटेल यांचे आभार मानले आहे.
काय म्हणाले खा. प्रफुल्ल पटेल..
जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांनी रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी मला निवेदन दिले होते. त्याचीच दखल घेत या योजनेचे उद्दिष्ट वाढवून देण्यासाठी पाठपुरावा केला. पालकमंत्र्यांनी ४०० घरकुलांचे उद्दिष्ट वाढवून दिले असून अधिकाधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करु.
– प्रफुल्ल पटेल, खासदार