- सावरी गावातील घटना
- नागपुरातून अवघ्या 15 तासात आरोपीला अटक
लाखनी, लाखनी शहरालगत असलेल्या सावरी/मुरमाडी येथे मोठ्या भावानेच लहान भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सततच्या भांडणामुळे मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली. सावरी/मुरमाडी येथील खेडेपार रोडजवळ दि.13 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मोठा भाऊ आणि आणखी एका मित्राने मिळून लहान भावाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. आकाश रामचंद्र भोयर (३१, रा. सावरी/मुरमाडी) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी त्वरीत या खून प्रकरणाची उकल करून आरोपीचा मोठा भाऊ राहुल रामचंद्र भोयर (३३, रा. सावरी) आणि मारोती न्यायमूर्ती (२८, रा. नागपूर) यांना ताब्यात घेतले.
घटनेची माहिती : सावरी गावातील मंगेश टिचकुले यांनी रात्री साडेअकरा वाजता लाखनी पोलिसांना फोन करून सावरीजवळील खेडेपार रोडवर 50 फूट अंतरावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच लाखनी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. तसेच पोलिस अधीक्षक लोहित मतानी, सहायक पोलिस अधीक्षक सुशांत सिंग, पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार, सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. आरोपींनी गावासमोरील रस्त्यावर आकाशचा खून करून मृतदेह सुमारे 50 फूट आत शेतात फेकून दिला. सावरी-खेडापार रस्त्यावर मृताचे रक्त सांडले होते.
श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी लाखनी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी लाखनी पोलिसांनी तपासाची गती वाढवत मोठा भाऊ राहुल भोयर याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले असून त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
नागपूरचे मारोती न्यायमूर्ती राहुल भोयर आणि मृत आकाश हे रात्री खेडेपार रोडवरील सिद्धार्थ ज्युनिअर कॉलेज कॅम्पसमध्ये गेले होते. वैयक्तिक वादातून आरोपी मारोती न्यायमूर्ती याने सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास आकाश भोयरवर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची कबुली मोठा भाऊ राहुल भोयर याने पोलिसांना दिली. यापैकी फरार आरोपी मारोती न्यायमूर्तीला मंगळवार 14 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. अवघ्या 15 तासात फरार आरोपींचा शोध घेऊन खुनाच्या आरोपीला ताब्यात घेऊन खुनाचे गूढ उकलण्यात लाखनी पोलिसांना यश आले आहे.