प्रतिनिधी/
गोंदिया : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्षी 6 हजार रुपये देण्याच्या अभिनव उपक्रमांतर्गत संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घेतला. मात्र अनेक तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणे बंद झाल्याने शासकीय कार्यालयात शेतकऱ्यांची गर्दी दिसून आली.
आमदार विनोद अग्रवाल यांच्या माध्यमातून कृषी विभाग आणि तहसील प्रशासनाच्या मदतीने पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील सर्व तांत्रिक अडचणी एकाच छताखाली सोडविण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 9 मार्च ते 12 मार्च या कालावधीत ग्रीनलँड लॉन, बालाघाट रोड टी पॉइंट गोंदिया येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात केवळ पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या सर्व तांत्रिक समस्यांचे निराकरण केले जाईल.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले आहे. या शिबिरात कृषी विभाग, महसूल विभाग व तहसील प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या समस्येमुळे तालुक्यातील हजारो शेतकरी आर्थिक लाभापासून वंचित आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना या शिबिराचा लाभ होणार आहे.