भंडारा, धनगर समाजाला आदिवासींच्या हक्काच्या आरक्षणात वाटा मिळू नये, सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात उचललेले खाजगीकरणाचे पाऊल मागे घेण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी आज भव्य मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेल्या हजारो आदिवासी बांधवांच्या घोषणांनी शहरात दुमदुमले.शहरातील दसरा मैदान, लालबहादूर शास्त्री चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. पिवळ्या झेंड्यांसोबत आदिवासींनी विविध मागण्यांचे फलकही हातात घेतले होते.जोरदार घोषणा देत आपली ताकद दाखवून दिली.भंडारा शहरात एवढा मोठा मोर्चा यापूर्वी कधीच पाहिला नव्हता.
महामार्ग रोखला
या मोर्चात हजारो आदिवासी सहभागी झाले होते.हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला.काही काळ रास्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला कसरत करावी लागली.त्रिमूर्ती चौकातील मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी ज्येष्ठ आदिवासी नेत्यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे पत्र सुपूर्द केले.