पंतप्रधान आवास योजना भंडारा दुसऱ्या क्रमांकावर, चंद्रपूर तिसऱ्या क्रमांकावर…
राज्य ग्रामीण गृहनिर्माण योजना चंद्रपूर दुसऱ्या, वर्धा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
गोंदिया, 7 : अमृत महा आवास अभियान 2022-23 अंतर्गत, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने आज केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजना प्रभावीपणे राबविलेल्या जिल्ह्यांची निवड केली आहे. केंद्र व राज्य पुरस्कृत गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीत चांगली कामगिरी करून गोंदिया जिल्ह्याने नागपूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्ह्याला प्रथम, भंडारा जिल्ह्याला द्वितीय तर चंद्रपूर जिल्ह्याला तृतीय क्रमांक मिळाला आहे. राज्य पुरस्कृत गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीतही गोंदिया जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. चंद्रपूरला दुसरा तर वर्धा जिल्ह्याला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
गोंदिया जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 2450 भूमिहीन लाभार्थ्यांपैकी सर्व लाभार्थ्यांना घरे देण्यात आली आहेत. तसेच या योजनेंतर्गत मंजूर 95 हजार 291 घरांपैकी 92 हजार 972 घरे बांधण्यात आली असून उर्वरित 6 हजार 168 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 2 हजार 858 भूमिहीन लाभार्थ्यांपैकी 1 हजार 891 लाभार्थ्यांना घरे देण्यात आली आहेत, तर 41 हजार 923 मंजूर घरांपैकी 37 हजार 750 घरे बांधण्यात आली आहेत.
भंडारा जिल्ह्यात 5 हजार 929 भूमिहीन लाभार्थ्यांपैकी 4 हजार 495 लाभार्थ्यांना घरे देण्यात आली आहेत, तर 63 हजार 463 मंजूर घरांपैकी 59 हजार 301 घरे बांधण्यात आली आहेत.
गोंदिया जिल्ह्यात राज्य पुरस्कृत गृहनिर्माण योजनेंतर्गत 12 हजार 576 मंजूर घरांपैकी 12 हजार 240 घरे बांधण्यात आली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात 23 हजार 275 मंजूर घरांपैकी 22 हजार 990 घरे बांधण्यात आली आहेत, तर वर्धा जिल्ह्यात 11 हजार 170 मंजूर घरांपैकी 10 हजार 325 घरे बांधण्यात आली आहेत.