राजर्षी शाहू महाराज जयंती…
हा “सामाजिक न्याय दिन ” का व कसा
Contact for consultation
– डॉ. संजीव लिंगवत, सिंधुदुर्ग.
विभागप्रमुख: न्यायवैद्यक शास्त्र
संपर्क: 9421268268
आमचे आदर्श थोर विचारवंत प्राध्यापक कै. हरी नरके यांनी खरं तर महाराष्ट्रात शाहू महाराज जयंती साजरी होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या दरबारात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना प्रस्ताव सादर केला. नंतरच्या हरीभाऊ नरके यांच्या आग्रहाखातर सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना जयंतचं स्वरूप सामाजिक न्याय दिन म्हणून पुढं आलं. त्यांच्या सपत्नीक भेटीत प्रा. हरीभाऊ नरके यांनी अशी अनेक गोष्टी आम्हाला सांगितल्या. शेवटी एवढंच सांगेन हि आज मोबाईल हातात घेऊन आपणं हे वाचत आहात त्यांच क्रेडिट पण राजर्षी शाहू महाराजांनाच जात. लोकमान्य टिळकांच्या विरोधात जाऊन सर्वसामान्य माणसाला शिकवण्यासाठी राजरै शाहू महाराजांनी घेतलेली धडपड खरोखरच अभिमानास्पद… भारतातील होमिओपॅथिक दवाखाना पहिल्यांदा सुरू करायचा मान पण त्यांचाच जो दवाखाना अजुन चालू आहे. देशाला प्रभावशाली विचारवंत दिले ते राजर्षी शाहू महाराज यांच्या मोफत वसतीगृहात शिकलेल्या पोरांनी च…
समाजातील प्रत्येक व्यक्ती शिकली पाहिजे म्हणून फक्त कायदा नाही तर मुस्लिम ,महार, चांभार,ख्रिश्चन,आदिवासी,जैन,लिंगायत,मराठ्यांसाठी शाळाच नाहीत तर मोफत वसतिगृह!
विधवा विवाह व बाल विवाह बंदीच नाही तर सतीची चाल बंदी आणि स्री शिक्षण सक्ती !
फक्तच सामाजिक आरोग्य नाही तर भारतातील पहिला समुळ रोग उच्चाटन करणाऱ्या होमिओपॅथीक औषध प्रणालीचा दवाखाना!
फक्त कृषी घोषणा नाही तर राधानगरी धरण बांधून संपूर्ण देशात कृषी क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्र अव्वल ठरवलं !
फक्त शैक्षणिक, कृषी क्रांती नाही तर भारतची राज्यघटना तयार करणाऱ्या भारतरत्न आंबेडकर यांना वैचारिक क्रांती पुरुष बनवून राजकीय क्रांती !
“महाराज, जात पाहून स्कॉलरशिप आणि नोकऱ्या देता, हे काही बरे नव्हे. लायकी पाहूनच त्या दिल्या पाहिजेत.”
…सांगलीचे लै फेमस वकील गणपतराव अभ्यंकर एकदा राजर्षी शाहू महाराजांबरोबर रथातनं चाललेवते. बोलता-बोलता त्यांनी महाराजांना सुनावलं.
…शाहू महाराज सत्तेवर येण्याआधी नोकरीतल्या सगळ्या वरच्या, महत्त्वाच्या जागा सधन उच्चवर्गीय लोकांनाच दिल्या जायच्या. महाराजांनी मात्र खालच्या-अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांना मोठ्या पदाच्या नोकर्या द्यायला सुरूवात केली होती. त्यावर नाराज होऊन गणपतरावांनी हा आरोप केला होता.
…महाराज गप्प बसले. काहीही बोलले नाहीत. त्यांनी आपला रथ घोड्यांच्या पागेकडे नेला. नोकराला म्हन्ले, “चंदी आन रं.” त्यानं आणलेले हरभरे महाराजांनी एका जाजमावर टाकले. त्याबरोबर हरभरे खायला सगळी घोडी पळत आली. जी दांडगी, तगडी होती, ती लहान, अशक्तांना मागं सारून पुढं घुसली. शिंगरं आन् म्हातारी मागं र्हायली. त्यांना खायला चंदी मिळालीच नाही. महाराज म्हन्ले, “बघितलंत का अभ्यंकर, जी चलाख, दांडगी आणि ‘लायक’ होती त्यांनीच समद्या चंदीचा फडशा पाडला. लहान, रोगी आनि अशक्त उपाशीच र्हायली का नाय? म्हनून मी चंदी तोबऱ्यात भरून त्यांना देतो. तसं चारल्याशिवाय ती सशक्त हुनारंच न्हाईत… मग मागासलेल्या अस्पृश्य समाजाला, तुमच्यासारख्यांच्या बरोबरीला आनायला काय करायला पायजे? खास सवलती नको का द्यायला???”
अशा विचारांचा राजांचा राजा, लोकराजा सत्तेवर असताना गोरगरीबांना काय कमी पडणार होतं? आवो, इतिहासात कधी झाली नसंल अशी क्रांती झाली. माझ्या शाहूच्या राज्यात उच्चवर्गीयांच्या मांडीला मांडी लावून बसून अस्पृश्य – बहुजनांतील मुलंमुली शिक्षण घ्यायला लागली !
फासेपारधी-मातंग-गारूडी समाजातल्या लोकांना राजदरबारी नोकर्या दिल्या गेल्या.
त्यांना कामधंदे सुरू करायला शाहूराजांनी खिशातले पैसे दिले !
जातीभेदाची कीड नष्ट करायला आंतरजातीय विवाह लावले गेले…
विधवाविवाह-स्त्रियांना शिक्षण,
त्यांचे सबलीकरण यावर भर दिला गेला !
कोवळ्या वयाच्या भिमरावामधनं, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं भारतरत्न घडवण्यात शाहूमहाराजांचा सिंहाचा वाटा होता ! “शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी साजरी करा. ते सामाजिक लोकशाहीचे खरे आधारस्तंभ होते.” असे उद्गार बाबासाहेबांनी काढले, ते उगाच नाही.
मग सांगा,
छत्रपती शिवरायांनी दिलेल्या स्वराज्याचं सुराज्य करून समाजाला खऱ्या अर्थाने न्याय कोणी दिला ?
बस्स !
आज आपलं अस्तित्व फक्त ,
राजर्षी शाहू महाराजांच्या मुळेच हे विसरलो तर गद्दार आम्हीच !
राजर्षी !!
हजारो राजे झाले, मात्र माणसातला राजा, राजातला माणूस हाच आणि असा सन्मान लाभणारा हाच राजा.
वारसा नेमका कशाचा असतो हे लख्खपणे समजलेला राजा.
आजच ह्या राजाला का आठवायच ?
जेव्हा महाराष्ट्रातल्या आदिवासी, डोंगराळ, दुर्गम, ग्रामीण भागातल्या शाळा ‘ परवडत नाहीत ‘ म्हणून नादान राज्यकर्ते बंद करायला निघतात तेव्हा तब्बल शंभर वर्षापूर्वी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा कायदा मंजूर करून अंमलात आणणारा हा राजा आठवायचा.
जेव्हा शिक्षण व्यवस्था भांडवली हातात देऊन बटिक करायला राज्यकर्ते आतुर झालेले आहेत तेव्हा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात बहुजनांच्या शिक्षणासाठी बोर्डिंग, शाळा उघडायला सढळ हस्ते मदत करणारा राजा आठवायचा.
संपूर्ण मुंबई इलाख्याचे शिक्षणाचे बजेट होते त्यापेक्षा जास्त तरतूद आपल्या राज्यात करून ते पैसे शिक्षणावर खर्च करणारा खरा शिक्षणमहर्षी !!
जेव्हा दलित समाजातल्या माणसाला घोड्यावरून मिरवणूक काढली म्हणून मारहाण केली जाते तेव्हा शंभर वर्षापूर्वी दलित माणसाला आपल्या गावात हॉटेल काढून देऊन तिथे चहा प्यायला जाणारा राजा आठवायचा.
जेव्हा ऑनर किलिंग सारखा हिडीस प्रकार बोकाळलेला असताना, पोटच्या लेकरांचे जीव घेणारे हैवान असताना शंभर वर्षापूर्वी आपल्याच घरात मराठा धनगर विवाहाला पुढाकार घेणारा राजा आठवायचा.
मुलींच लग्नाचं वय कायद्याने वाढवून, सज्ञान मुलांना स्वतःच्या लग्नाचा हक्क कायद्याने देणारा तोही १०० वर्षांपूर्वी, दूरदृष्टी असलेला राजा.
जेव्हा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फीचे पैसे सरकारने दिले नाहीत म्हणून पदवी प्रमाणपत्र मिळायला अडवल जात तेव्हा डॉक्टर आंबेडकरांच्या मागे उभा राहणारा राजा आठवायचा.
जेव्हा महाराष्ट्रात लेकीबाळी हंडाभर पाण्यासाठी पाच पाच किलोमीटर पायपीट करतात तेव्हा दूरदृष्टी दाखवून धरण बांधून सिंचनाची सोय करणारा राजा आठवायचा.
जेव्हा लोकशाही मार्गाने लोककल्याणकारी राज्यव्यवस्था राबवणे अपेक्षित असलेल सरकार भांडवलदारांच्या तुंबड्या भरण्यात दंग होत तेव्हा मर्यादित अधिकार आणि संसाधन असताना लोककल्याण साधणारा राजा आठवायचा.
पिढीजात वारसा, संपत्ती काहीही पाठबळ नसताना केवळ ज्ञानाच्या जोरावर संपत्ती आणि अधिकार मिळवता येतो हे सांगणारा राजा आठवायचा.
ज्या संस्थेत अहमदनगर जिल्ह्यातली लाखो मुल शिकलीत आणि आजही ती संस्था शंभर वर्षाची झाल्यावर लाखो मुल दरवर्षी शिकतात , त्या संस्थेत शिकण्याच भाग्य मला लाभल , त्या संस्थेची पायाभरणी करणारा राजर्षी !!
रयतेचा राजा छत्रपती !!
राजर्षी शाहू महाराज !!
१) भारतातील संस्थाने आणि राजे त्यांच्या वर्तनाने लोकांच्या संतापाचे कारण ठरले.पण शाहू महाराजानी राजेपणाची व्याख्याच बदलून टाकली..कल्याणकारी राज्य कसे असते याचा वस्तुपाठ घालून दिला..
२) राजकीय स्वातंत्र्य अगोदर की सामाजिक सुधारणा अगोदर ? असा वाद महाराष्ट्रात झाला पण राजकीय व्यवस्थेतून सामाजिक सुधारणा किती प्रभावीपणे अंमलात येऊ शकतात याचा प्रत्यय त्यांनी आणून दिला
३) पुरोहित आणि राजे अशी सांगड सर्वत्र असताना ती तोडून पर्यायी धर्मपद निर्माण करण्यापर्यंत आव्हान पुरोहितशाहीला दिले हे राजसत्तेने क्वचितच केले होते
४) ज्या सुधारणा करण्यासाठी आज आपण झगडतो त्या अगदी त्यांनी सहज करून दाखवल्या.आज लग्नाचे मुलींचे वय १८ की २१ हा वाद सुरू असताना त्यांनी १९१९मध्ये मुलींच्या लग्नाचे वय १४ केले पण आज १०० वर्षांनी आपण त्या वयापुढील बालविवाह ही थांबवू शकलो नाही.
५) शिक्षण हक्क कायदा आणायला देशाला २००९ साल लागले पण महाराजानी ९२ वर्षे अगोदर (१९१७ला)करून दाखवले
मुले न शिकवणाऱ्या पालकांना शिक्षा करण्याची आज हिंमत नाही . हे त्याकाळात करून दाखवले.आजही पुरेशी वसतिगृहे नसताना त्याकाळात करून दाखवली
६) विधवा विवाह आजही होण्यात अडचणी येतात,समाजाची मानसिकता नकारात्मक आहे. १९१६ मध्ये त्यांनी विधवा विवाह कायदा केला.हे धाडस खूप काळाच्या पुढचे होते
७) भटक्या जमातींना आजही गुन्हेगार समजून त्यांच्यावर हल्ले होतात.नेहरूंनी येऊन १९५२ ला गुन्हेगारी कलंक पुसला पण महाराजानी ते ३४ वर्ष अगोदर करून दाखवले
८) महारोग्यांची वेदना बाबा आमटेच्या आनंदवनानंतर आपल्याला कळली पण महाराजानी १८९७ सालीच महारोग्यासाठी आश्रम काढला
९) शेतकरी आत्महत्या होताना अजूनही तो राज्यकर्त्यांचा प्राधान्यक्रम होत नाही.पण सिंचन,दुष्काळ उपाययोजना, हे त्या काळात करून दाखवले
१०) औद्यीगिकीकरण रोजगार यावर आज परिसंवाद फक्त होताना ते केव्हाच महाराजानी करून दाखवले
११) मर्यादित क्षेत्रात अमर्यादित काम हे बाबा आमटेंच्या वाक्याचे शाहू महाराज प्रतिक ठरले…एक राज्य किती कल्याणकारी असू शकते याने आपण थक्क होतो …
वंदन या राजाला….
हेरंब कुलकर्णी
८२०८५८९१९५
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त लेख…
*लोककल्याणकारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज*
—————————–
-डॉ.श्रीमंत कोकाटे
—————————–
छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कसबा बावडा येथे झाला.1884 साली ते छत्रपतींच्या कोल्हापूर गादीवरती दत्तक म्हणून आले.1884 ते 1894 या दहा वर्षात त्यांनी राजकोट आणि धारवाड या ठिकाणी उच्च शिक्षण पूर्ण केले. 1894 साली त्यांचा राज्याभिषेक झाला.
राज्याभिषेकानंतर त्यांनी आपल्या राज्याचा दौरा केला. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, वंचित, उपेक्षित, भूमिहीन प्रजाजनांचे दुःख पाहून त्यांचे मन हेलावले, छत्रपतीच्या अंतःकरणामध्ये प्रचंड वात्सल्य होते. ते जसे स्वाभिमानी होते, तसेच ते प्रेमळ होते. आपल्या राज्यात अमुलाग्र बदल करण्याचा संकल्प त्यांनी केला. राज्यारोहणामुळे शाहू महाराजांचा सत्कार पुण्यातील सार्वजनिक सभेने आयोजित केला होता, त्यादरम्यानच पुण्यात हिंदू-मुस्लिम दंगल झालेली होती आणि या दंगलीला टिळकाची मदत होती, टिळक हे वयाने शाहू महाराजांपेक्षा वीस वर्षांनी मोठे होते. सत्कार प्रसंगी शाहू महाराज म्हणाले “हिंदू-मुस्लिमांनी एकोप्याने राहावे, भांडण करू नये” शाहू महाराजांची वयाच्या विसाव्या वर्षीची प्रगल्भता ही त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची प्रचिती आहे. टिळक दंगल घडविण्याच्या बाजूचे तर शाहू महाराज शांतता प्रस्थापित करणारे होते.
शाहू महाराजांनी आपल्या राज्यात शिक्षणाचा प्रसार केला. प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे आणि मोफत केले. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, हे त्यांचे विचार होते. मंदिरातील पैसा शिक्षणासाठी वापरला. सर्व जाती धर्मातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृहांची स्थापना केली. मराठा बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, जैन बोर्डिंग, दलित बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग इत्यादी बोर्डिंगची स्थापना शाहू महाराजांनी केली.
पुणे येथील श्री. शिवाजी मराठा सोसायटी, ऑल इंडिया श्री. शिवाजी मेमोरियल सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, नाशिक येथील उदाजी मराठा शिक्षण संस्था, नागपूर येथील शिक्षण संस्था, चेन्नई येथील शिक्षण संस्था अशा अनेक शैक्षणिक संस्था उभारण्यात शाहू महाराजांचा पुढाकार होता. रयत शिक्षण संस्था स्थापन करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण शाहू महाराजांच्या राजवाड्यावर राहून झाले. त्यांनी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले.
राजर्षी शाहू महाराजानी 1917 साली विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. 1919 साली आंतरजातीय विवाहाचा कायदा केला. बाजारपेठ स्थापन केली. जयसिंगपूर शहराची स्थापना केली. त्यांनी भारतातील सर्वाधिक जलसाठ्याचे राधानगरी हे पहिले धरण भोगावती नदीवर 1908 साली बांधले. छत्रपती शिवाजी राजांचा जगातील पहिला अश्वारूढ पुतळा 1921 साली पुणे या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते उभारला. पहिले शिवचरित्र लिहिणाऱ्या कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले.
1899 साली वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या पुरोहिताची त्यांनी हकालपट्टी केली. बहुजन पुरोहित तयार करणारी शिवाजी वैदिक शाळा त्यांनी सुरू केली. डोणे नावाचे धनगर विद्वान त्या शाळेचे प्राचार्य होते. भास्करराव जाधव यांनी *घरचा पुरोहित* नावाचे पुस्तक लिहिले. बहुजनांचा आणि ब्राह्मणांचा धर्म एक नाही, हे त्यांनी स्वतंत्र धर्माची स्थापना करून सिद्ध केले. स्वतंत्र धर्मपीठावर त्यांनी सदाशिव लक्ष्मणराव पाटील बेनाडीकर या विद्वानाची नियुक्ती केली.
शाहू महाराजांनी आपल्या राज्यात कधी भेदाभेद केला नाही. याउलट उपेक्षित, वंचित, भूमिहीन, अस्पृश्य, शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी जातींना त्यांचा डावललेला हक्क अधिकार मिळावा, यासाठी 1902 साली आरक्षणाची सुरुवात केली. भारतात आरक्षणाचा पाया घालणारा राजा म्हणजे शाहू महाराज होय. प्रशासनातील एकाधिकारशाहीला त्यांनी पायबंद घातला. त्यांनी सर्व जातींना प्रसासनात प्रतिनिधित्व दिले. त्यांनी मराठा समाजालाही आरक्षण दिले की जे आजच्या व्यवस्थेने हिरावून घेतले.
शाहू महाराज हे बुद्धिप्रामाण्यवादी होते, त्यांनी भविष्य, पंचांग, मुहूर्त कधीही पाहिला नाही. भविष्य सांगण्यासाठी आलेल्या जोतिष्याला तुरुंगात डांबून त्याला बुद्धिप्रामाण्यवादाचे महत्व पटवून दिले. त्यांनी भाकडकथा, पुराणकथा नाकारून प्रतिगामी विचारांना नेस्तनाबूत केले. त्यांनी ग्रंथप्रामाण्य नाकारले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात कृषी क्षेत्रात आमूलाग्र क्रांती केली. नगदी पिकांना चालना दिली. पन्हाळा टी-4 हा चहाचा वाण विकसित करून त्याची लागवड केली. तो चहा निर्यात होत असे. त्यांनी शेतीत आधुनिकीकरण आणले. शेतीसाठी बाजारपेठ उभारली. पाणीपुरवठ्याची सोय केली. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक उद्योगांची उभारणी केली.
आपल्या राज्यात समता प्रस्थापित करण्यासाठी शाहू महाराजांनी आपले राजेपद पणाला लावले. ज्या जातींना गुन्हेगार ठरवण्यात आलेले होते, अशा जातीवरचे निर्बंध राजांनी उठवले. त्यांना नियमित हजेरीतुन मुक्त केले. त्यांना आपल्या राज्याच्या संरक्षण खात्यात महत्त्वाच्या पदावरती नेमले. अस्पृश्यता नष्ट व्हावी, यासाठी ते अस्पृश्याच्या घरी जेवले. अस्पृश्यांना आपल्या राजवाड्यावर स्नेहभोजन ठेवले. अन्यायग्रस्त गंगाराम कांबळेला न्याय देऊन त्याला हॉटेल टाकून दिले. त्या हॉटेलला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, यासाठी स्वतः शाहू महाराज आपल्या सहकाऱ्यांना घेऊन हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी जात असत. महार, मांग, चांभार इत्यादी पैलवानाबरोबर देशभरातून आलेल्या पैलवानांनी कुस्ती खेळावी म्हणून त्यांना जाट, सरदार, पंडित अशी नावे दिली.
महिलांचा आदर सन्मान करणारे त्यांचे धोरण होते. विधवा पुनर्विवाह कायदा केला. त्यांना शिक्षण मिळावे यासाठी अनेक योजना सुरू केल्या. आपल्या कुटुंबातील स्त्रियांना शिक्षण दिले. महाराणीच्या हस्ते धरणाचे उद्घाटन केले तर कन्या राधाबाई यांचे नाव धरणाला दिले. तेच इतिहासप्रिद्ध राधानगरी धरण आहे.
जातिभेद नष्ट व्हावा, यासाठी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाला चालना दिली. याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या कुटुंबापासून केली. त्यांनी आपली बहीण चंद्रप्रभादेवी यांचा विवाह इंदोरचे यशवंतराव होळकर यांच्या बरोबर निश्चित केला, तो पुढे राजाराम महाराजांनी लावून दिला, असे सुमारे 25 आंतरजातीय विवाह घडवून आणले, यातून त्यांनी मराठा- धनगर आणि इतर जाती एकमेकांचे विरोधक नसून नातेवाईक आहेत, हे सिद्ध केले. म्हणजे शाहू महाराज हे केवळ बोलके सुधारक नव्हते, तर कर्ते सुधारक होते,
छत्रपतींची परंपरा जातीव्यवस्था मोडणारी व समता प्रस्थापित करणारी परंपरा आहे. छत्रपतींची परंपरा जातीव्यवस्था पाळणारी विषमतावादी परंपरा नाही. छत्रपतींची परंपरा प्रगल्भ परंपरा आहे, ती संकुचित नाही.
शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उच्च शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत केली. मूकनायक या नियतकालिकासाठी मदत केली. शाहू महाराज म्हणाले “बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे नेते आहेत आणि तेच खरे लोकमान्य आहेत”. शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या मुंबई येथील घरी जाऊन त्यांचा सत्कार केला, याप्रसंगी शाहू महाराज म्हणाले “रमाबाई माझी धाकटी बहीण आहे, तुम्ही लंडनवरून परत येईपर्यंत मी तिला माहेरी कोल्हापूरला घेऊन जातो”
माणगाव आणि नागपूर येथील परिषदेत जाऊन शाहू महाराजांनी बाबासाहेबांना खंबीर पाठिंबा दिला. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सोनतळी कॅम्प वरती स्नेहभोजन दिले आणि मानाचा जरीपटका देऊन सत्कार केला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात “छत्रपतींनी मानाचा जरीपटका माझ्या मस्तकी चढविला, त्याचा मी सदैव सन्मान राखीन”
शाहू महाराजांच्या मुला-मुलींच्या लग्नात करवले म्हणून भटक्या विमुक्त, दलित जातीतील समवयस्क मुला-मुलींना सोबत घेतले होते, जेणेकरून विषमता नष्ट व्हावी व सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, हे शाहू महाराजांचे धोरण होते.
शाहू महाराजांनी आपल्या राज्यात हिंदू-मुस्लिम हा भेद केला नाही. मुस्लिमांच्या शिक्षणासाठी त्यांनी मुस्लिम बोर्डिंगची स्थापना केली. आपल्या राज्यातील गरिबातल्या गरीब मुस्लिमांना कुराण मराठी भाषेत वाचता यावे, यासाठी अरबी भाषेतील कुराणाचे मराठी भाषांतर करण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची देणगी दिली. शंभर वर्षांपूर्वीची ही रक्कम खूप मोठी रक्कम आहे. शाहू महाराजांनी पाटगावच्या मौनी बाबाच्या मठाच्या उत्पन्नातील रक्कम तेथील मुस्लिमांच्या मशिदीच्या बांधकामासाठी दिली, तर रुकडीतील पिराच्या देवस्थानाच्या उत्पन्नातील रक्कम तेथील अंबाबाई मंदिराच्या बांधकामासाठी व दिवाबत्तीसाठी दिली, इतका सामाजिक सलोखा शाहू महाराजांच्या राज्यात होता
शाहू महाराजांनी शाहीर लहरी हैदर, चित्रकार आबालाल रहमान, गानमहर्षी अल्लादिया खाँसाहेब, मल्लविशारद बालेखान वस्ताद, बालगंधर्व यांना सर्वतोपरी मदत केली. शाहू महाराजांनी सामाजिक समतेसाठी आणि सामाजिक सलोख्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले,
शाहू महाराजानी आपल्या राज्यात सर्वांचा विकास आणि शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी सनातनी व्यवस्थेविरुद्ध उघडपणे संघर्ष केला, परंतु आज सामाजिक वातावरण बिघडवले आहे, जातीजातीत आणि धर्माधर्मात विष पेरले जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. सर्व समाज बांधवांनी एकोपा जपावा, हे शाहूचरित्र सांगते,
शाहू महाराजांचा सामाजिक सलोखा आपण कायम ठेवणे, हेच खरे शाहू प्रेम आहे. शाहू राजांची जयंती (२६ जून) सणासारखी साजरी करा, असे डॉ. आंबेडकरांनी सांगितले आहे.
आमचे तासगांव, सांगली येथील मित्र ऍड. कृष्णा पाटील लिहितात,
शाहू राजांची गाठ नक्की कधी पडली हे आता आठवत नाही. त्यांच्याबद्दल काही गोष्टी मात्र आठवतात. पण फार पूर्वीच म्हणजे लहानपणीच ते कुठेतरी खोलवर भेटले असावेत. पण नक्की कुठे काहीच स्मरत नाही.
शाळेला जात होतो. गरिबीने पायाच्या चिंध्या झालेल्या. वर्गात काटकर मास्तर होते. एकदा म्हणाले, “लै शाहू महाराज झालायस काय? सरळ बस की..” मग मी सरळ बसलो. शाहू महाराज मात्र आत आत घुमत राहिले. कोण असतील शाहू महाराज? त्यांनी कोणते किल्ले घेतले असतील? किती स्वाऱ्या केल्या असतील? बऱ्याच प्रश्नांचं काहूर माजायचं..
नंतर पुस्तकातच कधीतरी फोटो पाहिला. राजा म्हणलं की राणी, महाल, जिरेटोप. पण यांच्याकडे बघितले की हा रांगडा गडी वाटायचा. आपल्यातलाच कुणीतरी असल्यागत. आजोबा, पणजोबा किंवा खापर पणजोबा. कदाचित शाळेत पण गेला नसावा. आपल्या आजोबा, पणजोबा सारखाच निरक्षर..
नंतर थोड्या वाचनातून समजलं, हा पण शाळेत गेला होता. पण लंडनला. विंचेस्टर कॉलेजला. गड्याकडे बघून वाटायचं हा कुठल्यातरी इथल्या शाळेत शिकला असेल. पण याला प्रवेश मिळाला लंडनला..
तिथं नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करायची एक खास पद्धत होती. शाहू आणि त्यांच्याबरोबरच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केलं लॅटिन भाषेतून. मग उत्तर द्यायची वेळ आली. हा पट्ट्या मराठीतून बोलला. नुसता बोलला नाही, काॅलेजच हादरवून सोडलं. मराठीतून बोलला ते इंग्रजी येत नाही म्हणून नव्हे, मराठीचा अभिमान म्हणून. देशाचा स्वाभिमान म्हणून.
शाहूंच्या इंग्रजी बद्दल काय सांगावं?
एकदा प्रबोधनकार भेटायला आले होते. “भिक्षुकशाहीचे बंड” हा ग्रंथ लिहितोय म्हणाले. मग काय विचारता? राजांनी विचारलं, सॅव्हेल वाचलाय का? इंगरस्वाल वाचलाय का? प्रबोधनकार चकित झाले. हा राजा आहे का विद्वान पंडित आहे. त्याच वेळी प्रबोधनकार म्हणाले, “फिलोसाॅफर किंग” या कल्पनेत बसणारा हा प्लेटोचा तत्वज्ञ राजा आहे.
नंतर अशाच ठिकाणी शाहू भेटत राहिले. कधी पुस्तकातून. कधी शिल्पातून. कधी गाण्यातून.
पण पुढे कॉलेजला गेल्यावर मात्र हा राजा आकाशाएवढा असल्याचं जाणवलं. कोल्हापूर ते महाबळेश्वर अंतर एका दमात घोडे स्वारीने पार पाडणारा राजा. एकदा पागेला आग लागली तर खांद्यावरनं घोड्यांना बाहेर काढलं. कुस्तीच्या आखाड्यात एकदा अवाढव्य पैलवानाने आगाऊपणा केला. त्याच्या लंगोटीला धरूनच अंतराळ केलं. अलगद फडाबाहेर ठेवला. एकदा शाहूंचे टाॅन्सिलचे ऑपरेशन होते. डॉक्टरला म्हणाले, “भूल देऊ नका. तसेच ऑपरेशन करा..” डॉक्टरने तसेच ऑपरेशन केले.
पुढे पुढे तर त्यांचे वेगळेच दर्शन होत राहीले. राजा म्हणून शेतीचे काम. उद्योग. सहकार. आंतरजातीय विवाह. जातीभेद नष्ट करण्याची चळवळ. सत्य सुधारक हॉटेल. राजवाडा ते महारवाडा पर्यंत केलेले काम. सहकार कायदा. संगीतकला. चित्रपट कला. नाट्य कला. वैज्ञानिक दृष्टिकोन. सांस्कृतिक चळवळ….अबब्…
सारंच आकलनाच्या पलीकडचं… शाहुराजांना समजून घ्यायला अजून बराच कालावधी लागणार आहे.
(# राजर्षी शाहू महाराज यांच्या ‘एकेरी’ उल्लेखा बद्दल क्षमस्व )
“राजर्षि शाहू महाराज”
हे राजा…
तुझे आश्रित,तुझे हुजरे जेव्हा
तुझ क्षत्रियत्व नाकारुन
तुला शूद्र ठरवतात,राजद्रोह करतात
तुला तुझा धर्म शिकवतात,थयथयाट करतात,
आपल्या वेदपुराणाच्या अभ्यासाचा गर्व करतात
तेव्हा, राजा तु शांतपणे संयमाने त्यांना त्यांची जागा दाखवतोस…
पंचगंगेच्या साक्षीने, तुझ्या संध्ये समई
राजपुरोहित स्वतः पारोशे येऊन मंत्र म्हणतो, स्नान घालतो
वेद मंत्रा ऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हणणा-या
उर्मट,माजोरड्या राजपुरोहिताला तु ठरवल असतस तर राजा
शिरच्छेद वा देहदंडाची शिक्षाच होती…
पण,तु राजा राजासारखा वागलास
विवेक जागृत ठेवून न्याय केलास…
स्वतःचा अपमान गिळलास,
त्याला सामाजिक लढ्यात रुपांतरीत केलेस
तुझीच प्रेरणा बहुदा गांधीने घेतली असावी!
वेदोक्त प्रकरणी लोकमान्य हि संभ्रमित होते…
शिवाजी क्लबच्या नावाखाली
दहशतवादी आणि रयत लुटारुंना तु रोखलस,
तेव्हा तुला दोषी ठरवणारे, हे कावेबाज लोक स्वस्थ बसले नाहीत…
सुडाचा प्रवास चालूच ठेवला…
‘आमचे स्वराज्यद्रोही छत्रपती’
असा तुझा साहित्य सम्राटाने गौरव केला…
आणि सारस्वतांची मान खाली गेली…
परदेशात जाऊन राजा तु,
रम-रमा-रमीत न रमतात,नाविन्याचा शोध घेतला,
उद्योग उदिम पाहिले…
रयतेसाठी अहोरात्र कष्ट घेतलेस
शिक्षण-समतेचा नवजागर केलास