तिरोडा – पितृपक्ष सुरू होताच कावळ्यांना अन्न देण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार, श्राद्ध विधीमध्ये कावळ्यांना अन्न न दिल्यास तो अपूर्ण मानला जातो. कारण कावळे हे पितरांचे प्रतीक मानले गेले आहे.
श्राद्ध पक्षात 16 दिवस पितरांना स्मरण करून त्यांना अन्न अर्पण करण्याची परंपरा आहे. मात्र, सध्याच्या काळात गावागावांमध्ये कावळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली असून “काव-काव” ची आवाज आता क्वचितच ऐकू येतो. त्यामुळे अनेकांना श्राद्ध विधी पूर्ण करण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत.
पूर्वी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कावळे सहज गावागावांत दिसायचे. मात्र आज शहरीकरण, पर्यावरणातील बदल आणि अन्नस्रोतांची कमतरता यामुळे कावळ्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
धर्मशास्त्रानुसार कावळ्यांना अन्न दिल्यास पितरांना तृप्ती मिळते आणि घरामध्ये शांती व समृद्धी नांदते. आजच्या बदलत्या परिस्थितीत ही परंपरा जपण्याची गरज अधोरेखित होत आहे.