मुंबई, दि. 17 ऑगस्ट
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी 16 ऑगस्ट रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पटले यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे पूर्व विदर्भातील काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत होईल.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज टिळक भवन येथे शिशुपाल पटले यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. यावेळी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संघटना व प्रशासन नाना गावंडे, तुमसरचे माजी आमदार अनिल बावनकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या गलथान कारभाराविरोधात जनतेत प्रचंड रोष आहे. या सरकारच्या कार्यकाळात शेतकरी, मजूर, महिला, विद्यार्थी, तरुण, व्यापारी, मध्यमवर्ग समाधानी नाही. आघाडी सरकारने राज्याचे दिवाळे काढले आहे. या सरकारने शेतकरी, बेरोजगार आणि सर्वसामान्यांना हतबल केले आहे. त्यामुळे लोकांमध्ये या सरकारविरोधात प्रचंड रोष आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजप आणि महायुतीतील घटक पक्षातील नेते या सरकारच्या कामावर खूश नाहीत, त्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून अनेक मोठे नेते काँग्रेस पक्षात जाणार आहेत.
काँग्रेसमध्ये दाखल झालेले शिशुपाल पटले म्हणाले की, मी अनेक वर्षे भारतीय जनता पक्षात काम केले, पण आता भाजप जसा अटलजी आणि अडवाणीजींच्या काळात होता तसा राहिला नाही. तो आता व्यापारी आणि ठेकेदारांचा पक्ष बनला आहे. या पक्षाला शेतकरी आणि सर्वसामान्यांशी काहीही देणेघेणे नाही. ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडून सत्ता मिळवण्याची हौस आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आवडत नाही. या देशातील व राज्यातील जनतेला न्याय मिळवून देण्याचे आणि राज्याला पुढे नेण्याचे काम काँग्रेस पक्षच करू शकतो, त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आत्मविश्वासाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे शिशुपाल पटले म्हणाले.