गोंदिया:
मुद्रांक अधिकारी कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग
शहरातील जयरत्न सभा चौकातल्या प्रशासकीय इमारतीमधील सह जिल्हा निबंधक कक्ष-१ व मुद्रांक जिल्हा अधिकारी कार्यालयात शनिवारी (दि.४) शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या घटनेत कार्यालयातील फर्निचर, महत्त्वाचे कागदपत्र व इलेक्ट्रिक उपकरणांचे नुकसान झाले.
प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील कक्ष क्रमांक-२३ मधील सह जिल्हा निबंधक कक्ष-१ व मुद्रांक जिल्हा अधिकारी कार्यालयातून शनिवारी सकाळी अचानक धुराचे लोट उठू लागल्याने परिसरात एक गोंधळलेले वातावरण निर्माण झाले. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीने काही मिनिटांतच फर्निचर, महत्त्वाचे कागदपत्र व इलेक्ट्रिक उपकरणे जळली. साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याने अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने मोठा अपघात टळला.
इमारतीतील इतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी धूर दिसताच धाडस दाखवत दार तोडले आणि भिंतीवर लटकविण्यात आलेले अग्निशामक यंत्र व पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. काही महत्त्वाचे दस्तऐवज व साहित्य जळाल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा सरकारी इमारतींतील सुरक्षा मानके आणि वीज व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सध्या इलेक्ट्रिकच्या पीओबी सिलिंगमधील लपलेल्या तारा वापरात असून, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किट या आगीला कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट होत आहे. कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.