वर्धा :
कारंजा तालुक्यातील खैरवाडा गाव हे विदर्भातील एकमेव महापाषाण वारसा स्थळ म्हणून इतिहासात विशेष महत्त्वाचे ठरते. येथे सापडलेली दीड हजारांहून अधिक शिळावर्तुळे (Stone Circles) हा प्राचीन वारशाचा अनमोल ठेवा आहे.
इतिहास अभ्यासकांच्या मते, साधारणतः अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी मृत व्यक्तींच्या स्मृती जपण्यासाठी ही शिळावर्तुळे उभारण्यात आली. 1871 मध्ये इंग्रज अधिकारी जे. जे. कॅरी यांनी या ठिकाणी प्रथम उत्खनन केले होते, तर 1981 मध्ये पुरातत्त्व विभागानेही येथे संशोधन केले.
या उत्खननातून घोड्याची नाल, सोन्याचे दागिने, लोखंडी व तांब्याची अवजारे, तांदूळ तसेच त्या काळातील चांदीची नाणी यांसारख्या वस्तू सापडल्या असून त्या पुण्यातील डेक्कन महाविद्यालयाच्या संग्रहालयात जतन आहेत.
इतिहास अभ्यासक आणि स्थानिक संस्था यांचे मत आहे की, या ठिकाणी अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत – इतक्या मोठ्या प्रमाणात शिळावर्तुळे का फक्त याच ठिकाणी सापडतात? येथे मोठी वस्ती अथवा शहर होते का? की एखाद्या महामारीमुळे इतक्या लोकांचे एकाच ठिकाणी दफन करण्यात आले?
अभ्यासक चमूने प्रशासनाला आवाहन केले आहे की या सांस्कृतिक वारशाचे नीट जतन व्हावे, खैरवाड्यातच संग्रहालय उभारले जावे व या ठेव्याला पर्यटन आणि संशोधन केंद्राचा दर्जा द्यावा.
या अभ्यासक चमूमध्ये मिशन समृद्धीचे किशोर जगताप, बहार नेचर फाउंडेशनचे किशोर वानखडे, ग्राम सेवा मंडळाचे अतुल शर्मा, विदर्भ पर्यावरण परिषदेचे संजय सोनटक्के, इतिहास अभ्यासक डॉ. संजीव लिंगवत, डॉ. प्रियराज महेशकर व डॉ. धनंजय सोनटक्के यांचा समावेश होता.
स्थानिक नागरिक आणि संस्थांच्या सहकार्याने या ठेव्याचे संवर्धन झाले तर खैरवाडा हे विदर्भाच्या सांस्कृतिक वारशाचे जागतिक नकाशावर स्थान मिळवू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.